

सोलापूर : यंदाच्या वर्षी अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, शासनाच्यावतीने नुकसान भरपाई दिली जात आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाई संदर्भात माहिती आणि तक्रार करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतू सोलापूर जिल्हा प्रशासनाने तशी सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी आणि सीना, भीमा नदीला पूर आल्याने खरिप हंगामातील पिकांची आतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सात लाख 64 हजार शेतकऱ्यांना 867 कोटी 38 लाख रुपये मंजूर असून, आतापर्यंत तीन लाख 41 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 409 कोटी 20 लाख रुपये जमा झाले आहेत.
परंतू उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अजून पैसे जमा झाले नाही. नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत तक्रार कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. दरम्यान धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या वाटपाबाबत काही शेतकऱ्यांकडून अडचणी व तक्रारी प्राप्त होत आहेत.
टोल फ्री क्रमांकावर शेतकरी अनुदान वाटप, रक्कम न मिळणे, अर्जाची स्थिती किंवा संबंधित शासकीय कार्यालयांकडून होणारा विलंब याबाबत आपली तक्रार नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात येईल. शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धाराशिव जिल्हा प्रशासनाने केले आहे. परंतू सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून अशी कुठलीही सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिलेली नाही.
कर्नाटकात मागील काही वर्षांपासून बाधित शेतकऱ्यांना अनुदान देताना, कर्जमाफी रक्कम देताना संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जाची स्थितीबाबत अपडेट माहिती परिहारा नावाच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाधित शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती ऑनलाईन दिसते. परंतू ती पध्दत महाराष्ट्रात नाहीत.