

सोलापूर : शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणार्यावरून महापालिका अधिकार्यांमध्ये सुसंवादाचा अभाव आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करणारे सार्वजिनक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांचा दावा दस्तुरखुद प्रशासन प्रमुखांनी खोडून काढला.
शहराला चार दिवसांआड आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तीन दिवसांआड पाण्याचे नियोजन तूर्त नसल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितल्याने महापालिकेतील अधिकार्यांमध्ये सुसंवादाचा अभाव दिसून येत असल्याचे जाणवले. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहरातील काही भागाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग महापालिकेने सुरू केला आहे. महिनाभरानंतर शहरातील उर्वरित भागांमध्ये पाचऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाने शहरातील काही भागात एक जुलैपासून चार ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवापासूनच (दि. 30) शहरातील सुमारे 40 टक्के भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा चौबे यांनी केला होता. चार ऐवजी साडेतीन तास पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणतः महिनाभर हा प्रयोग केला जाणार आहे.
त्यानंतर शहरातील उर्वरित 60 टक्के भागात पाचऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने एक दिवस कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना विचारणा केली असता याबाबत त्यांनी आपली जबाबदारी झटकत तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा आपली नाही, ज्यांनी घोषणा केली त्यांनाच विचारा असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. शहरात सध्या चार दिवसाआड आणि पाच दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे. तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे कोणतेच नियोजन नसल्याचे आयुक्तांनी जाहीर केल्यामुळे त्यांना पाणीपुरवठ्याचे गांभीर्यच नसल्याचे जाणवते. प्रसार माध्यमांसमोर वेगवेगळी विधाने केल्याने तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट होते.
पाकणी येथे जलशुध्दीकरण केंद्र उभे करण्यासाठी वन विभागाकडे जागा मागणीचा प्रस्तावासंदर्भात शुुक्रवारी (दि. 4) नागपूरला बैठक आहे. बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव भोपाळला पाठवला जाणार आहे. त्या ठिकाणी अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.