

सोलापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून यंदाच्या चालू आर्थिक वर्षात एकाही नवीन डांबरीकरण रस्त्याचा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल करण्यात आला नाही. यामुळे यंदा नवीन रस्त्यांची या योजनेच्या माध्यमातून भर पडणार नाही.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाच्यावतीने चालू आर्थिक वर्षात नवीन रस्त्याचे प्रस्ताव सादर केले नाहीत. यामुळे जिल्ह्यात रस्त्यांच्या संख्येत नव्याने भर पडणार नाही. या योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्याची कामे केली जातात. या योजनेमुळेच अनेक रस्ते डांबरीकरणाने पक्के झालेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा वनवासही या योजनेमुळे दूर झाला आहे. या रस्त्याने शेतकऱ्यांचा ऊस किवा अन्य पिके वेळेत बाजारात विक्रीसाठी नेता येतात.
मात्र, येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या वतीने यंदाच्या वर्षात एकाही नवीन रस्त्याचा प्रस्ताव दिलेला नाही. या योजनेतून आजतगायत जिल्ह्यातील अनेक गावे व शिवारे ही पक्क्या रस्त्याने जोडलेली आहेत. यंदाच्या वर्षी मात्र नवीन प्रस्ताव दिलेला नाही. जे रस्ते या योजनेतून होणार असल्याच्या चर्चेने ग्रामीण भागातील नागरिक आनंदले होते. त्यावर विरजणच पडल्याची भावना व्यक्त होत आहे. नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव सादर करणे व त्याला मंजुरी मिळवणे गरजेचेच आहे.