

सोलापूर : यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर, भंडाऱ्याची उधळण, साऊंड सिस्टिम आणि दिव्यांची रोषणाई, विविध देखाव्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.
चार हुतात्मा चौकातील अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील नवी वेस, सरस्वती चौकमार्गे अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली.
राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील चित्रफित एलईडीच्या माध्यमातून दाखवण्यात येत होती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेच्या वतीने अहिल्यादेवींचा वाडा साकारण्यात आला होता. रेड्डी कंपनी मंडळाच्या वतीने भगवान शंकर व बाळूमामांचे भव्य पोस्टर लावण्यात आले होते. पुण्यश्लोक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने अहिल्यादेवींच्या मूर्तीच्या वर नागफणी असलेली भगवान शंकराची मूर्ती ठेवण्यात आली होती. सरस्वती युवक मंडळाच्या वतीने अहिल्यादेवी गोरगरीबांना दान करतानाचा देखावा सादर केला होता.
होळकरशाही प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यादेवींनी भारतात उभारलेल्या मंदिरांचा सुरेख देखावा सादर केला होता. डी. एम. प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यादेवींची उभारलेली मूर्ती साकरली होती. गडदर्शनचा राजा युवक मंडळाच्या वतीने अहिल्यादेवींची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आली होती. इतर मंडळांनीही आकर्षक देखावे सादर करून मिरवणूक काढली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर जनसागर लोटला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, खा. ज्योती वाघमारे, आ. विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, सभागृहनेते नरेंद्र काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रसेचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.