Ashadhi Wari| वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या
Ashadhi Wari
वेळापूर : बैठकीप्रसंगी बीडीओ कुलकर्णी, जि. प. सदस्या मीनाक्षी सरतापे, पं. स. सदस्या विमल जानकर, रजनीश बनसोडे आदी.
Published on
Updated on

​वेळापूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१ जुलै रोजी वेळापूर मुक्कामी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वेळापूर ग्रामपंचायत कार्यालयात नियोजन बैठक झाली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांचे वेळापूरनगरीत भव्य स्वागत आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय साधून हा पालखी सोहळा अत्यंत यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा दृढ निर्धार याप्रसंगी व्यक्त केला. या बैठकीचे आयोजन सांगोला गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी सरतापे, पंचायत समिती सदस्या विमल जानकर, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, पोलिस उपनिरीक्षक प्रणित कांबळे, तलाठी सावता गोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रामुख्याने पालखी मार्गाची स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था, भाविकांसाठी आरोग्य सेवा, अखंडित वीजपुरवठा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचे चोख नियोजन आणि सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त यांसारख्या पायाभूत व मूलभूत सुविधांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. सरपंच रजनीश बनसोडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली व वेळापूर प्रशासन वारीसाठी संपूर्ण ताकदीनिशी सज्ज असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news