

संगमेश जेऊरे
सोलापूर : उजनी धरणात आफ्रिकन कॅट फिश माशामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मांगूर, सकरमाऊथ यासारख्या कॅट फिशमुळे उजनी धरणातील जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. आफ्रिकन कॅट फिशमुळे उजनीतील माशांचे स्थानिक ३५ प्रजाती नष्ट झाल्या असून, आणखी ४० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
नुकतेच सोलापुरात मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतलेल्या बैठकीत उजनी पाणलोट क्षेत्रात फिश मिल आणि फिश ऑईल उद्योग आणता येईल का, याचा अभ्यास, चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी उजनी परिसरात स्थानिक जलचर वनस्पतींची लागवड करण्यासाठी मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उजनी धरण येथील जैवविविधता तसेच आफ्रिकन कॅट फिश व स्थानिक माशाबाबतच्या केलेल्या अभ्यासात आलेली आकडेवारीनुसार मागील ३० ते ४९ वर्षांचा अभ्यास केला असता उजनी धरणातील स्थानिक ३० ते ३५ माशांच्या प्रजाती कायमच्या नष्ट झालेले आहेत तर ४० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
सकरमाऊथ माशामुळे स्थानिक माशावर मोठा प्रघात झाला असून हे मासे मासेमारीच्या जाळ्याही फाडतात, स्थानिक माशांनाही खातात, याबाबतची माहिती बीएनएचएस ट्रस्टचे डॉ. उन्मेश काटवटे यांनी बैठकीत सादर केले आहे.