Solapur Textile Industry : कच्चा माल महाग, ऑर्डर ठप्प; सोलापूर वस्त्रोद्योग संकटात

उत्पादन खर्चात वाढ; उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले
Solapur Textile Industry
Solapur Textile Industry
Published on
Updated on

गौसपाक पटेल

सोलापूर : एकेकाळी देश-विदेशात टॉवेल, चादरी व इतर वस्त्रोद्योग उत्पादनांसाठी ओळख असलेला सोलापूरचा वस्त्रोद्योग उद्योग सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून मजुरीचा खर्चही वाढला आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

याशिवाय पानीपत, मेरठ आणि गुजरात येथे अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या आधारे मोठ्या प्रमाणावर वस्त्रोद्योगात उत्पादन सुरू झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जलद उत्पादन होत असल्याने सोलापूरच्या पारंपरिक उद्योगावर त्याचा थेट परिणाम होत आहे. यामुळे स्पर्धेत टिकून राहणे स्थानिक उद्योजकांसाठी कठीण बनले आहे. दुसरीकडे, युद्धजन्य आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे परदेशातून मिळणाऱ्या निर्यात ऑर्डर जवळपास ठप्प झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही अपेक्षित मागणी नसल्याने तयार मालाचा साठा वाढत असून अनेक कारखाने मर्यादित क्षमतेने सुरू आहेत. अनेक ठिकाणी तर उत्पादनही बंद करण्यात आले आहेत. या सर्व कारणांमुळे सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केली. परिस्थितीत लवकर सुधारणा होण्याची चिन्हे नसून, किमान डिसेंबरपर्यंत बाजारपेठ पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे मत आहे.

कच्चा माल, वीज, मजुरी महाग

कॉटन यार्न (सूत), रंग, विविध केमिकल्स, पॅकेजिंग साहित्य तसेच इतर कच्च्या मालाच्या किंमतीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः कॉटन यार्नचा दर प्रतिकिलो सुमारे २२० रुपयांवरून ३३० रुपयांपर्यंत पोहोचल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच वाहतूक खर्चातही प्रतिकिलो सुमारे १० रुपयांची वाढ झाली असून, वीज, इंधन आणि मजुरीचे वाढलेले दर उद्योगावर अतिरिक्त आर्थिक भार टाकत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news