Solapur News: स्थायी सभापतीसाठी रंजिता चाकोते, अविनाश पाटलांमध्ये रस्सीखेच

आज उमेदवारी अर्ज दाखल होणार; 6 मार्चला निवड प्रक्रिया
Solapur News
Solapur NewsPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये सध्या जोरदार लॉबिंग सुरू असून ‌‘कुबेराची खुर्ची‌’ नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सभापतिपद हे लिंगायत समाजाला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपमध्ये नगरसेवक अविनाश पाटील आणि नगरसेविका रंजिता चाकोते यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. दोघांपैकी एकाची उमेदवारी अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत असून अंतिम निर्णयासाठी पक्षश्रेष्ठींकडे हालचाली वेगाने सुरू आहेत.

स्थायी समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज आज (दि. 4) सकाळी महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत सभापतिपदाचा अधिकृत चेहरा स्पष्ट होणार आहे. स्थायी समिती सभापती निवडीवरून सत्ताधारी भाजपात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ताधारी गटामध्ये अंतर्गत चर्चांचे सत्र सुरू असून अंतिम क्षणापर्यंत नाव जाहीर न करण्याची रणनीती भाजपकडून अवलंबली जात आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांकडून या पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. एमआयएम तसेच शिवसेना गटाकडून सूचक-अनुमोदक मिळण्याची परिस्थिती नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा भाजपातील अंतर्गत निर्णयालाच अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

‌‘कुबेराची चावी‌’

स्थायी ही महापालिकेची आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रभावी समिती मानली जाते. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवरील निर्णय या समितीतून घेतले जात असल्याने सभापतिपदाला विशेष राजकीय वजन आहे. त्यामुळेच ‌‘कुबेराची चावी‌’ रंजिता चाकोते की अविनाश पाटील यांच्याकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होताच या राजकीय उत्सुकतेवर पडदा पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news