Gajanan Maharaj Palkhi : गण गण गणात बोतेच्‍या गजरात शहरात श्री गजानन महाराज पालखीचे आगमन

महापौरांनी केले स्‍वागत, वरिष्ठ अधिकारी, नागरिकांची उपस्‍थिती
Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj Palkhi
Published on
Updated on

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि.१८) सोलापूर शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. रूपाभवानी चौकात महापौर विनायक कोंड्याल व त्‍यांच्‍या पत्‍नी धनश्री कोंड्याल यांच्‍या हस्‍ते पालखीचे पूजन झाले.

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीसह ७५० वारकरी शनिवारी सकाळी नऊच्‍या सुमारास हिप्‍परगा येथे दाखल झाले. तेथून जुना तुळजापूर नाका, मड्डी वस्‍ती चौक येथून दहाच्‍या सुमारास रुपाभवानी चौकात पालखीचे आगमन झाले. यावेळी शहराच्‍या वतीने प्रथम नागरिक महापौर विनायक कोंड्याल यांनी पालखीचे स्‍वागत केले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेता नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, पालिका उपायुक्त सोनाली यादव यांची प्रमुख उपस्‍थिती होती. तेथून पालखी तुळजापूर वेस, बाळीवेस, दमाणी प्रशाला, सम्राट चौक मार्गे सद्‍गुरु प्रभाकर स्‍वामी महाराज मंदिरात विसावली. प्रभाकर स्‍वामी महाराज मंदिरात पालखीतील वारकरी व भक्‍तांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली होती. सायंकाळी पाचच्‍या सुमारास पालखी कुचन प्रशालेकडे मार्गस्‍थ झाली. त्‍याठिकाणी रात्रीचा मुक्‍काम असून महाप्रसादाचेही नियोजन करण्यात आले होते. कुचन प्रशालेत गजानन महाराजांच्‍या दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. हजारो भाविकांनी यावेळी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणीही प्रशालेबाहेर विविध प्रकारचे स्‍टॉल लावण्यात आले होते.

शहरातील पालखी मार्गावर नागरिकांनी वारकऱ्यांसाठी फळे, अल्‍पोपहार, पाण्याची सोय केली होती. आज रविवारी (दि.१९) सकाळी कुचन प्रशाला येथून पालखी सात रस्‍ता येथील उपलप मंगल कार्यालय येथे जाणार असून तेथे रविवारचा मुक्‍काम असणार आहे. त्‍यानंतर सोमवारी (दि.२०) पालखी दमाणी नगरमार्गे तिऱ्हेकडे प्रस्‍थान करणार आहे. शहरात पालखीच्‍या स्‍वागतासाठी महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगु, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, श्रीदेवी फुलारे, अविनाश पाटील, राजश्री दोडमनी, श्वेता खरात, लता फुटाणे, ॲड. विजय मराठे यांच्‍यासह महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय नेते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

वीस हजार भाविकांना पंचपक्वान्न जेवणाची सोय

सद्गुरु प्रभाकर स्‍वामी महाराज मंदिरात एक हजार वारकरी व २० हजार भाविकांसाठी पिठलं-भाकरी, चपाती, आमटी, भात व जिलेबीचा महाप्रसाद देण्यात आला. तेथे भाविकांनी गजानन महाराजांच्‍या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. त्‍यानंतर रात्री कुचन प्रशाला येथे चारुबुवा, वांग्याची भाजी, भजी, गरगट्टा, जिलेबी असा दोन ते अडीच हजार भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात आला. रविवारी उपलप मंगल कार्यालयात दुपारचे व संध्याकाळचे जेवण होणार आहे. त्‍यासाठी चपाती, भाजी, भात, आमटी आणि गोड पदार्थांचा मेनू असणार आहे. रविवारी उपलप मंगल कार्यालयात नाभिक समाजाच्‍या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कपड्यांना इस्त्री करून देणे, चपला शिवणे व पॉलिश करणे यांसारख्या सेवाही देण्यात येणार आहेत.

संत श्री गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत २४ तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली असून संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. वारकरी हे आपल्या शहराचे मानाचे पाहुणे आहेत. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.
- विनायक कोंड्याल महापौर, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news