

सोलापूर : शहरातील दुसऱ्या मुक्कामासाठी ऩिघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी मार्गावर गुलाब फुलांच्या पायघड्यांसह पुष्पवृष्टीने भाविकांनी स्वागत केले.
कुचन प्रशालेतील पहिला मुक्काम संपवून रविवारी सकाळी पालखी जोडबसवण्णा चौक, लष्कर, जगदंबा चौक, सात रस्ता मार्गे उपलप कार्यालयात विसावली. दरम्यान, मार्गात खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महिलांसमवेत हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळत भक्तीभाव जपला. रविवारी दिवसभर उपलमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. अनेक संस्थांनी येथे सेवा केली. नाभिक समाज बांधवांनी मोफत केशकर्तन सेवा केली. तसेच सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांचे पाय चेपणे, मसाज देणे आदी सेवा केल्या. दोन दिवस सोलापूरकरांचा पाहुणचार घेत सोमवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे साकडे
रविवारी जगदंबा चौक येथे खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या व पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खा. प्रा. डॉ. वाघमारे यांनी राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदो, देशावर कोणतेही संकट येऊ नये, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळून वरुणराजाची कृपा व्हावी, सर्वजण निरोगी व आनंदी राहावे तसेच महाराष्ट्र संतपरंपरेच्या मार्गावर अखंड प्रगती करत राहो, असे साकडे घातले.
आज पंढरीकडे मार्गस्थ
सोमवारी सकाळी उपलप मंगल कार्यालयापासून पालखी मिरवणुकीस सुरवात होणार आहे. तेथून रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी, रेल्वे ब्रीज, रामवाडी दवाखाना, नागनाथ मंदिर, लक्ष्मी विष्णु चाळ, मरिआई चौक, दमाणी नगर येथे सकाळी ११ वा. आगमन दमाणी नगर येथून दुपारचे भोजन नंतर तिर्हे मार्गे पंढरपुरकडे मार्गस्थ होईल.