

नातेपुते : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भक्तिमय व टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात पालकमंत्री पालखीसोबत चालले.
धर्मपुरी पालखीतळावर वारकरी भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘राम कृष्ण हरी...ज्ञानोबा माऊली, तुकाराम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलिस बँड पथकाने भक्तिमय धून वाजवून पालखीचे स्वागत उत्साहाने केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. श्री भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.
दरम्यान, माऊली, माऊलींच्या जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद, पुढे चौघडा, त्यामागे अश्व व २७ दिंड्या, माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ आणि २५० पेक्षाही जास्त दिंड्या मार्गक्रमण करत होत्या.
नातेपुते मुक्कामी सोहळा विसावला
माऊलीच्या पालखीचा विसावा न्याहारीसाठी कारूंडे बंगला या ठिकाणी थांबून, त्यानंतर नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास वैष्णवांचा मेळा नातेपुते नगरीत सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्काम ठिकाणी विसावला. यावेळी नातेपुते नगरपंचायत व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले.