

माढा : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कथित गैरकारभार, दिरंगाई, शेतकरी व नागरिकांना होणारा त्रास तसेच माढा नगरपंचायतीकडून छत्रपती संभाजी महाराज चौक (कुर्डूवाडी वळण) येथे हायमास्ट दिवा बसविण्याच्या मागणीची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ आज सकाळी माढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शंभूराजे ऊर्फ संभाजी अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप, शेतकऱ्यांची मोजणी व इतर कामे विनाकारण रखडविली जात असल्याची तक्रार, एजंटांमार्फत आलेल्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप तसेच नागरिकांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याच्या मुद्द्यांवर यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच नगरपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही छत्रपती संभाजी महाराज चौकात हायमास्ट दिवा बसविण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
या दोन्ही मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळी रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा पोलिस स्टेशनचे पीएसआय महम्मद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.