

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीपाठोपाठ आता अक्कलकोट तालुक्यात अजगर आढळला आहे. त्याआधी 2020 आणि 2022 मध्ये अक्कलकोट तालुक्यात अजगर सापडल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजगरांचा अधिवास वाढत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय सोलापूरच्या सर्प वैभवातही भर पडली आहे.
धोत्री येथे एक 7.5 फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर, आता अक्कलकोटपासून 7 किलोमीटरवर असलेल्या हत्तीकणबस या गावात दुर्मीळ अजगर दिसून आला आहे. याची लांबी 8.5 फूट आहे. हत्तीकणबस येथील अजगरास नाग फाऊंडेशनचे सर्पमित्र भूकंप जोशी यांनी सुरक्षितपणे पकडले. याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना देण्यात आली. शिंदे यांनी या रेस्क्यूची माहिती वनविभागास कळवत नाग फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार सोबत घटनास्थळी दाखल झाले.
काही वेळातच वनविभागाची टीमही अक्कलकोटला दाखल होत या सापास वैद्यकीय तपासणीसाठी अक्कलकोट येथील पशुवैद्यकीय विभागात आणले गेले. येथील तपासणीनंतर हा अजगर सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व घडामोडी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. या घटनेमुळे या भागात अजगरांचा नैसर्गिक अधिवास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात 20 ऑक्टोबरला अजगर आढळला होता.
अजगर हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची एक अंतर्गत संरक्षित वन्यजीव आहे. यास बेकायदेशीररित्या पकडणे, बाळगणे, छळ करणे, घेऊन फिरणे, मारणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून सात वर्षांपर्यंत कैद शक्य आहे. हा बिनविषारी असून शेतातील उंदीर, घूस व इतर उपद्रवी प्राण्यांना खाऊन आपल्या शेती व परिसराचे नैसर्गिक समतोल राखतो. अजगर आढळल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तत्काळ जवळील जाणकार सर्पमित्र अथवा वन विभागाशी (हेल्पलाईन 1926 क्रमांकावर) संपर्क साधणे आवश्यक आहे.
सर्प अभ्यासक राहुल शिंदे, अनिल अलदार, भूकंप जोशी, यादव होटकर, स्वामी होटकर तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक रेणुका सोनटक्के, वनसेवक आकाश पाटोळे यांनी अजगर पकडण्यासाठी परिश्रम घेतले.