

सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुकाळे गल्लीत भरणारा दूध बाजार आता होम मैदान येथे सुरू आहे. या दूध बाजाराची लोकप्रियता आजही कायम आहे. दररोज बाराशे लिटर दुधाची विक्री होणाऱ्या या बाजारात शेतकऱ्यांना जागेवरच रोख पैसे मिळतात. तर शहरवासीयांना डोळ्यांसमोर फॅट तपासून उच्च प्रतीचे दूध खरेदी करता येते.
जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, सांगोला, उत्तर व दक्षिण सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातील अणदूर, काटगाव, तामलवाडी येथून पशुपालक दूध विक्रीसाठी येतात. डेअरीमध्ये दूध घालण्यापेक्षा या बाजारात चांगला दर मिळत असल्याने पशुपालकांना फायदा होत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत भरणाऱ्या या बाजारात दुधाचा दर फॅटनुसार ठरविला जातो.
सध्या सात ते नऊ फॅट असलेल्या दुधाला प्रतिलिटर ११ ते १३ रुपये दर आहे. शुक्रवार पेठेत पुकाळे गल्लीत भरणारा हा बाजार जागेच्या कारणावरून अनेकदा स्थलांतरित झाला. सध्या तो होम मैदान परिसरात भरतो. सध्या दुधाची आवक घटली आहे.