Solapur News: कारी ते टोणेवाडी रस्ता अज्ञात इसमाने खोदल्‍याने नागरिकांची गैरसोय

Solapur News: कारी ते टोणेवाडी रस्ता अज्ञात इसमाने खोदल्‍याने नागरिकांची गैरसोय
Published on
Updated on

बार्शी : कारी ते टोणेवाडी ग्रामीण मार्गाची गत अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या दोन्ही गावाची वाहतूक, दळणवळण याच मार्गातून होत आहे. अनेक फुल उत्पादक, दूध उत्पादक, विक्रेते नियमित धाराशिव बाजारपेठेसाठी या मार्गावरून जातात. यातच तब्बल अर्धा किलोमीटर रस्ता सीमाकंनाच्या पुढे जाऊन मशीनच्या सहाय्याने खोदून टाकला आहे. परिणामी दोन्ही गावासोबत या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे शेतकरी अरुण क्षीरसागर यांनी सांगितले.

तसेच रोड लगत असणारे मोठमोठाले वृक्ष उकरून टाकले आहेत. ठिकठिकाणी होत चाललेली अवैध वृक्षतोडीला वनविभाग अभय देत असल्याचे दिसून येत आहे. कार्यवाही होत नसेल तर संबंधित विभागाने आत्मचिंतन करावे. कायदा मोडणाऱ्यांची बेबंदशाही गावात वाढल्याने अनेक हिंसक घटना घडू लागल्या आहेत. गेल्‍या अनेक वर्षांपासून रोडलगतचे अनेक वृक्ष तोडून अनेक जणांनी त्यांची विल्हेवाट लावली.

दोन्ही विभाग डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही विभागाने रस्‍त्‍यालगत असणाऱ्या मोठ्या वृक्षांना आधुनिक प्रणालीद्वारे जिओ मॅपिंग करणे काळाची गरज आहे. दरम्यान, रस्ता अतिक्रमणावर कायदेशीर कार्यवाही होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ढावारे यांनी सांगितले.

दोन गावे जोडणाऱ्या या रस्त्यावर बेसुमार वृक्षतोडही होत आहे. मात्र यावरही कारवाई होत नाही. रस्ता खोदाई केली जात आहे. यातून नागरिकांच्या दळवळणाचा रस्ता अडविला जात आहे. या बाबी गंभीर असून संबंधित विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. या रस्त्यालगतच्या वृक्षतोडीवरही पायबंद घातला जावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news