

सोलापूर : सीना नदीच्या महापुरामुळे सहा तालुक्यातील 88 गावांना विस्थापित व्हावे लागले. संसार पुरात वाहून गेले. अशावेळी प्रशासन पहिले पाऊल टाकून प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बाधितांना जेवण पुरविण्याची आवश्यकता असतानाच अक्षय पात्र संस्थेला पैशाची मदत करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले. त्यामुळे पैसे लोकांचे, भोजन कीट देणार अक्षय पात्र संस्था, मग प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनात नेमकी जबाबदारी काय, असा प्रश्न व्यक्त होत आहे. बेजाबदार प्रशासनाविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महापूर आल्यानंतर बाधितांसाठी तात्पुरत्या निवारासाठी शेल्टर हाऊस सुरू करण्यात आली. यात 22 सप्टेंबर रोजी 3387 तर 28 सप्टेंबर रोजी 14 हजार 403 लोकांना या हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. शिवाय 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत 3 हजार ते 14 हजार यात लोक वास्तव्यास होते.
घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या भोजनासाठी शेजारच्या गावांनी, सामाजिक संस्थांनी जेवणासह अन्य साहित्यांची मदत दिली. प्रशासनाने धान्य वाटप करण्याचे जाहीर केले. हे करतानाच अक्षय पात्र संस्थेला पैसे देणगी रुपात द्या, त्यातून भोजन पुरविले जाईल, असे आवाहन केले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आवाहनावर पूरग्रस्त भागांतून तुमची जबाबदारी काय, असा प्रश्न विचारत आहेत.
किटसाठी 1200 रुपये
अक्षय पात्र संस्था पूरग्रस्तांना जेवण देण्याबरोबरच आता कीट वाटप करत आहे. देणगीदारांना एक किटसाठी 1200 रुपये देणगी देण्याचे आवाहन त्यांच्या सोशल मीडियावरुन करत आहेत. यात 1200, 2400, 3600, 4800 अशी देणगीचे उल्लेख आहेत.
250 किटचे वाटप
जिल्हा प्रशासन व अक्षय पात्र संस्थेच्या वतीने होनमुर्गी (दक्षिण सोलापूर) येथील पूरग्रस्त नागरिकांना 250 किटचे वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अक्षय पात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास उपस्थित होते.