

सोलापूर : ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र’, ‘सिद्धरामेश्वर महाराज की जय’चा जयघोष, विद्युत दिव्यांनी लखलखलेले मानाचे सातही नंदीध्वज, पांढरे शुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केलेले नंदीध्वजधारक आणि जमलेल्या हजारो भाविकांच्या साक्षीने बुधवारी रात्री होम मैदानावर कुंभारकन्येचा प्रतीकात्मक होमविधी सोहळा पार पडला.
होमविधीसाठी नंदीध्वजांची मिरवणूक सायंकाळी सहाच्या सूमारास हिरेहब्बू वाड्यातून निघाली. प्रारंभी मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्याहस्ते नंदीध्वजांची विधिवत पूजा करण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी नंदीध्वज मार्गस्थ होताना सुवासिनी नंदीध्वजाची मनोभावे पूजा करत होत्या. ही मिरवणूक पसारे वाडा, फौजदार चावडीजवळ आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आले.
मानाचे 2 ते 7 नंदीध्वजास विद्युत दिवे बांधून रोषणाई करण्यात आली. त्यानंतर हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजेनंतर नागफणी पेलणारे सोमनाथ मेंगाणे व नंदीध्वज उचलून देणारे मास्तर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज नंदीध्वज होम मैदानाकडे मार्गस्थ झाले.
होम कट्टाजवळ आल्यानंतर बाजरीच्या पेंढीस प्रतिकात्मक कुंभार कन्या म्हणून शालू नेसवून, सौभाग्य अलंकार घालून त्या कुंभार कन्येस मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार दंडा घालून सजविण्यात आले. विधीवत पूजा करून हिरेहब्बू यांच्याकडून होमास अग्नी देण्यात आला. त्यानंतर कुंभार यांना विड्याचा मान दिला गेला. नंतर होम कट्यास नंदीध्वज पाच प्रदक्षिणा घालून भगिनी समाजाजवळ आल्यानंतर देशमुखांच्या वासरुची भाकणूक झाली. त्यानंतर हिरेहब्बू यांनी पीकपाणीची भाकणूक केली. रात्री उशिरा नंदीध्वज मिरवणुकीने हिरेहब्बू वाड्यात दाखल झाले. फडीचा मानकरी व हिरेहब्बू यांना प्रसाद देवून महाप्रसाद वाटप करण्यात आले.
आज शोभेचे दारूकाम, ड्रोन लाईट शो
सिध्दरामेश्वर यात्रेतील चौथ्या दिवशी आज गुरुवारी दि. 15 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास होम मैदानावर शोभेचे दारुकाम होणार आहे. यासाठी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मिरवणुकीने होम मैदानाकडे मार्गस्थ होतील. यंदा देवस्थानने शोभेच्या दारुकामाबरोबरच 300 ड्रोनच्या माध्यमातून श्री सिध्दरामेश्वर महाराजांचे चरित्र, वचन हे दाखविले जाणार आहेत.