

माढा : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जी नुकसान भरपाई द्यायला सुरू केेली आहे. ती देत असताना मागच्या मे किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यावेळी पिकाची जी काही नुकसान भरपाई दिली होती ती रक्कम आत्ताच्या रकमेतून वजा करून शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाने सरसकट भरपाई देण्याचे आश्वासन पाळले नाही. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याची टीका शरदचंद्र पवार पक्षाचे संजय पाटील -घाटणेकर यांनी केली. सरसकट नुकसान भरपाई न दिली गेल्यास ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी माढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
घाटणेकर पुढे म्हणाले, राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू झाले आहेत. शासनाने घोषणा करताना 32 हजार कोटी रुपयांची आम्ही शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ हजार रुपये, सात हजार रुपये, बारा हजार रुपये अशा प्रकारच्या तुटपुंज्या रकमा जमा झाल्या आहेत.
9 ऑक्टोबरचा अद्यादेश व त्यातील तरतूदीचे आकडे व प्रत्यक्ष मिळालेली मदत यामध्ये तफावत आहे. हंगामी पीक व बहुवार्षिक म्हणजे फळ पिकांना किती नुकसान भरपाई याची जर आकडेवारी बघितली तर ह्याचा कुठेही ताळमेळ लागताना दिसत नाही. तीन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देऊ असे सांगितले.
आता दोन एकरची एनडीआरएफची आणि एक हेक्टरची राज्य शासनाची मिळून त्यांनी तीन हेक्टरची मर्यादा घातली असली तरीसुद्धा शेतकऱ्यांना पूर्वीच्या दोन अद्यादेशात जी रक्कम मिळाली आहे ती रक्कम वजा करून आणि तीन हेक्टर मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण तीन हेक्टरची मदत न देता अटी घातल्या आहेत.
टक्केवारीत कोणाचे 60 तर कोणाचे 75 टक्के नुकसान धरले आहे. ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपेक्षा अतिशय कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कुठलीही कपात न करता तातडीने मदत द्यावी. ती न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने काढलेल्या अद्यादेशानुसार मदत न देता मे महिन्यातल्या अतिवृष्टी झालेल्या मदतीची रक्कम त्यातून कपात केली जात आहे. ही बाब शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. याबाबत व सीनाकाठी पुरामुळे वाहून गेलेल्या मोटारीच्या संदर्भात अद्याप पर्यंत भरपाई दिली गेली नाही. या गोष्टी शरद पवारांच्या कानावर घातल्या आहेत. याबाबत योग्य तो अभ्यास करून आपण स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितल्याचे घाटणेकर म्हणाले.