

अनंत दोशी
माळशिरस : माऊली माऊली आणि हरीनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण याची देही याची डोळा अनुभवताना भाविक व वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
धावे अश्व माऊलींचा ।
उधळे भक्तीचा गंध ॥
रिंगणात हरपले भान ।
दुमदुमला विठुनामाचा छंद ॥
या काव्यरचनेचा प्रत्यय आणून देणाऱ्या सोहळ्यात टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला.
नातेपुते येथे पहाटे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र ऊमाब यांच्या हस्ते माऊलींची नैमित्तीक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता माऊलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. नातेपुतेपासून माळशिरसपर्यंत सुसज्ज असा चार पदरी पालखी मार्ग झाल्याने वारकऱ्यांची चांगली सोय झाली होती. अल्हाददायक वातावरणात सुमारे दीड ते दोन लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पालखी सोहळ्यातील पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडेकडे कूच केली. दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी हा सोहळा सकाळी मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्यांनी भोजन घेतले.
आज सकाळपासूनच पहिला गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकर्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. पुरंदावडेच्या रिंगण सोहळ्याची ओढ लागली होती. भोजनानंतर सोहळा सदाशिवनगरकडे मार्गस्त झाला. सदाशिवनगर येथे स्वागत केले. दुपारी दोन वाजता सोहळा पुरंदावडे येथील मैदानावर रिंगण सोहळ्यासाठी पोहोचला.