

सोलापूर : मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात अतिवृष्टी होत आहे; मात्र सोलापूर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून, गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यात केवळ १.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४८१.१ मिलिमीटर पाऊस पडत असतो. यंदा मात्र ७ जुलैपर्यंत अवघा १२१.०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे ढग पुढे निघून जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. समाधानकारक पाऊस न पडल्याने पेरणी रखडली असून खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम धोक्यात
जिल्ह्यात २१ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून यात सर्वाधिक ४२ टक्के पेरणी पंढरपूर तालुक्यात झाली असून, माळशिरसमध्ये २६ टक्के पेरणी झाली आहे. सर्वात कमी म्हणजे अवघी १.१ टक्के पेरणी अक्कलकोट तालुक्यात झाली आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची भीती आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात तीन लाख १५ हजार हेक्टरांवर पेरणी झाली होती.