

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभापती दिलीप माने यांच्या पुढाकाराने सायंकाळी भाजीपाल्याचे लिलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांसह व्यापार्यांचा फायदा होणार आहे.
पुण्याच्या बाजार समितीप्रमाणे सोलापूर बाजार समितीमध्ये ही दोन वेळेस भाजीपाल्याचे लिलाव सुरू व्हावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सभापती माने यांनी त्याची दखल घेत सायंकाळी भाजीपाल्याचे लिलाव सुरू केले आहे. पूर्वी फक्त सकाळीच भाजीपाल्याचे लिलाव होत होते. त्यामुळे गर्दी होत होती. दोन वेळच्या लिलावांमुळे विभागणी होणार आहे. बाजारातील पहाटे होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्याचबरोबर व्यापार्यांना सायंकाळीच पालेभाज्या मिळाल्यामुळे सकाळपासूनच विक्री करण्याची सोय होणार आहे.
सायंकाळी भाजीपाल्यांचे लिलाव सुरू करावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत होती. त्यानुसार सायंकाळी भाजीपाल्यांचे लिलाव सुरू केले. बाजार समितीमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे सायंकाळी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेतकरी, व्यापार्यांना निश्चित फायदा होईल, असे मत सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केले.
रात्री कर्नाटक मराठवाड्यातील व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येतात. त्यांना अडती रात्रीच भाजीपाल्यांची विक्री करतात. शेतकर्यांना सकाळच्या लिलावातील दर दिला जातो. याला अनामत विक्री असे बोलले जाते. अपवाद वगळता बाजार समितीत अनामत माल विक्रीमध्ये शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक होते. सायंकाळच्या लिलावामुळे लुबाडणूक थांबू शकते.