

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर्स लिमिटेड, कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलाच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू आहे. मात्र, याची दखल प्रादेशिक साखर कार्यालयाने घेतले नाही. त्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले असून, गुरुवारी (दि. ४) त्या कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन काढणार आहेत. तसेच बिले मिळाल्याशिवाय आंदोलन माघार न घेण्याचा इरादा शेतकऱ्यांनी केला आहे.
थकीत ऊस बिलाची रक्कम सुमारे २८०० रुपये प्रतिटन इतकी असून ती व्याजासह अदा करण्यात यावी. जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, साखर आयुक्तांनी १५ मे रोजी गोकुळ शुगर्सवर आरआरसीची कारवाई केली असली तरी त्यातून अद्याप कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. बिल मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहण्याचा मानस व्यक्त झाला. गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी, साखर आयुक्त आणि संबंधित कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.