

करमाळा : तालुक्यातील पोमलवाडी येथे रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने घराची भिंत कोसळली. त्यामध्ये घरात जेवण करीत असलेले वृद्ध पती-पत्नी जागीच ठार झाले. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) व शालन जगन्नाथ नवले (७५) असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे. करमाळा पोलिसात या घटनेची आकस्मिक नोंद घेण्यात आली आहे.
जुना पोमलवडी-चांडगाव रस्ता ते बॅकवॉटर उजनी गट नं- २३६ (उजनी संपादित क्षेत्र) कडे जाणाऱ्या कच्च्या रस्ता लगत कच्च्या भिंतींच्या पत्र्याचे शेडमध्ये हे वृद्ध पती-पत्नी राहत होते. रविवार (दि. ३१) झालेल्या वादळात भिंत कोसळली. अभिजित काळे यांनी घटनेची माहिती पोलिस व तहसील प्रशासनास सोमवारी दिली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाने घटनास्थळी मंडल निरीक्षक युसूफ बागवान यांच्यासह तलाठी सुरेश आडगळे, पोलिस पाटील अभिजित काळे, कोतवाल नम्रता कोळी यांनी सरपंच नवनाथ मल्हारी गायकवाड व महादेव भानुदास नवले यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.
पंचनाम्यानंतर रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह पोमलवाडी येथे नवले यांच्या शेतामध्ये दोघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. ठार झालेल्या वृद्ध दाम्पत्याच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.