

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची कोट्यवधींची उलाढाल आहे. मात्र, याच बाजार समितीत शेतकरी, हमाल, तोलारांसह इतर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे सभापती दिलीप माने, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराचे प्रमुख केंद्र असलेल्या बाजार समितीत सध्या अक्षरशः अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकाचा कार्यकाळ संपून लोकनियुक्त सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळ सत्तेत आले असले तरी शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याचे वास्तव दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने केलेल्या ऑन द स्पॉट पाहणीत समोर आले आहे.
दररोज हजारो शेतकरी आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असलेल्या या बाजार समितीत स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, शौचालयांची दुरवस्था, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि माल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांसाठी २७ एकरमध्ये उभारण्यात आलेली बाजार समिती आता शेतकऱ्यांच्या समस्यांचे केंद्र बनल्याची भावना व्यक्त होत असून, याकडे सभापती माने यांच्यासह संचालक मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा दावा शेतकऱ्यांतून होत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
कोट्यवधी रुपयांचा शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या २७ एकरच्या बाजार समितीत एका ठिकाणी आर.ओ. प्लान्ट बसविण्यात आलेला होता. मात्र, तो गायब असून, शेतकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी बाजार समितीत वणवण भटकावे लागत आहे. अन्यथा विकतचे पाणी घेऊन प्यावे लागत आहे. जिल्हा, इतर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर उन्हात थांबावे लागते. अशावेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.