

सोलापूर : पालखीच्या दर्शनाची भाविकांना लागलेली ओढ, टाळ - मृदंगाचा ‘जय जय रघुवीर समर्थ’, 'गणगण गणात बोते'चा अखंड गजर आणि पालख्यांची भेट होताच ज्ञानोबा - तुकोबांचा झालेला जयघोष अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी सोलापुरात संत भेटीचा सोहळा रंगला. शेगावहून आलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी आणि सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची पालखी या दोन्ही पालख्यांची भेट शनिवारी (दि.१८) श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात झाली.
संत श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात येताच सम्राट चौक येथील सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विसावली. आषाढी एकादशीनिमित्त शेगाव होऊन पंढरपूरला निघालेली शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात येण्याचे हे ५३ वे वर्ष आहे. सकाळी सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात पादुकांचे पूजन झाले. यानंतर पालखी सजवण्यात आली. तसेच पालखीचेदेखील पूजन झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन्ही पालख्यांची भेट झाल्यानंतर महाआरती करण्यात आली.