

सोलापूर : मासिक भाडे थकविले, परस्परच पोट भाडेकरू ठेवले, करार थकविले या व यासह अन्य विषयी ठपका ठेवत जिल्हा परिषदेने नेहरू वसतिगृह इमारतीमधील १३ व्यापारी गाळेधारकांना नोटीस बजावली.
नेहरू वसतिगृह इमारतीमध्ये एकूण १७ व्यापारी गाळे आहेत. त्यापोटी प्रत्येकाकडे मिळून तब्बल एक कोटी ४२ लाखांची थकबाकी होती. त्यापैकी एक कोटी १२ लाखांची वसुली झाली असून, उर्वरित ३० लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांना नोटिसा दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिली.
दरम्यान, याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेकडून सेस फंड वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नेहरू वसतिगृह इमारतीमधील व्यापारी गाळ्यांविषयी संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत.
ही आहेत कारणे
इमारतीमधील किशोर चंडक, संदीप गांधी, शाम क्षीरसागर, बी. आर. म्हमाणे, विजय प्रताप संघटना या दिग्गजांचे भाडे थकीत.
किशोर चंडक, कौशिक शहा, रवी रोरा, शाम क्षीरसागर, बी. आर. म्हमाणे यांनी जिल्हा परिषदेच्या परस्परच पोटभाडेकरू ठेवले.
मनोहर लोमटे, बी. आर. म्हमाणे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे यांच्याबरोबर झालेला करार संपल्याची माहिती.
गाळाधारकाने परस्परच बांधकाम करून व्यापारी गाळा अधिक रूंद केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार.