

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : राज्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची ज्याप्रमाणे हत्या झाली. तशी परिस्थिती माझ्यावर उद्भवू शकते. महायुतीला पाठिंबा दिल्याचा राग मनात आहे. त्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी तक्रार राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. कदम यांनी आज (दि.२) सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली.
पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कुख्यात गँगचा यामागे हात आहे. माझा बाबा सिद्दिकी होण्याअगोदर पोलिसांनी मला संरक्षण द्यावे आणि मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळा, अशी मागणी केल्याचे कदम यांनी पत्रकारांना सांगितले. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे त्या गँगबाबत मी माहिती दिली आहे. पोलीस तपास करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीदरम्यान मला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली होती. पुण्यातील एका कुख्यात गँगने मला धमकी दिली आहे. रिव्हॉल्व्हर लावून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न होत आहे. मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दिली आहे. माझा बाबा सिद्दिकी होण्याअगोदर मला संरक्षण देऊन संबंधित संशयित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
सोलापूर पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. परंतु मुख्य संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. सोलापूर पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.