

सोलापूर : शहरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवही डीजेमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणार्या मिरवणुका, कार्यक्रम यामध्ये डीजे लावण्यास बंदी घातली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
दै. ‘पुढारी’ने ‘डीजेमुक्त सोलापूर’साठी सर्वात प्रथम मार्च महिन्यापासून वृत्तमालिका, स्तंभलेखनाच्या माध्यमातून डीजे विरोधात हाक दिली होती. याचा परिणाम म्हणजे डीजेमुक्त सोलापूर ही चळवळ सुरू झाली. त्यानंतर सजग सोलापूरकर समिती, डीजे विरोधी कृती समितीने आंदोलन केले. प्रशासनानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात तर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरात गणेशोत्सवात डीजे बंदीचा आदेश काढला.
यामुळे शहर जिल्ह्यातील गणेश मंडळांनीही डीजेमुक्त उत्सव साजरा करीत राज्यात आदर्श निर्माण केला. त्यानंतर आता नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीतही डीजेला बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी तसा आदेश काढला आहे. यामुळे आता नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र मिरवणुकीत पारंपरीक वाद्यांचा वापर करावा लागणार आहे.
नवरात्रौत्सवात अनेक मंडळे पारंपरीक वाद्येच वापरतात. परंतु त्यामध्ये देखील डीजेचा वापर करता येणार नाही. सोलापूरकरांची या कर्णकर्कश आवाजातून पुन्हा एकदा मुक्ती होणार आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य सोलापूरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लेझर, बीम लाईटवर बंदी
मिरवणुकांमध्ये प्रखर लेझर, बीम आणि प्लाझ्माचा वापर केला जातो. लेझर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्यांना दुखापत, ईजा होते. तसेच वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लाईट्स लावण्यास पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बंदी घातली आहे. या लाईट्स लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिसांना विशेषाधिकार
शहरात नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक व त्यावरील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना विशेष अधिकार दिले आहेत. परिस्थिती पाहून मिरवणुकांचा मार्ग ठरवणे, मार्ग बदलणे, मिरवणुकीत सामिल नागरिकांचे वर्तन कशाप्रकरे हवे, ध्वनिक्षेपकाची आवाजाची मर्यादा ठरविणे, रस्त्यात अडथळा करणार्यांवर कारवाई करणे यासह अनेक विशेषाधिकार त्यांना दिले आहेत. याचा भंग करणार्यांवर ते कारवाई करू शकतात. 22 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू राहतील.