

टेंभुर्णी : - टेंभुर्णी शहरात गाडी पार्किंगच्या वादातून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा शुल्लक कारणावरून चाकू भोसकून व कोयत्याने वार करून निर्घुण खून केल्याची गंभीर घटना घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी सहा जणावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ०१ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वा.सुमारास शहरातील नाळे वस्ती येथे घडली असून या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे.
नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय-४१ वर्षे) रा.वेणेगांव (ता.माढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राज कदम, समाधान चौधरी दोघे रा.टेंभूर्णी (ता. माढा), सागर कुटे रा.वेणेगांव (ता.माढा), रणजीत पवार रा.टेंभूर्णी (ता.माढा) व इतर अनोळखी दोघेजण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्हि एस यांनी वेगाने तपास करून दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत विलास पवार (वय-२८ वर्ष) रा. शिवाजीनगर टेंभुर्णी (ता.माढा) व प्रतीक नागनाथ बागवाले (वय-२२ वर्ष) रा.बागवाले वस्ती, टेंभुर्णी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत टेंभूर्णी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि.०१ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वा.चे सुमारास नाळेवस्ती, टेंभूर्णी येथे सद्दाम पटवारी यांच्या घरासमोर पार्कींकच्या जागेमध्ये वाद होता. मयत नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय-४१ वर्षे) रा.वेणेगांव (ता.माढा) हा तेथे पोहचला.यावेळी सद्दाम पटवारी यांच्या घरासमोर सद्दाम पटवारी व राज कदम यांच्यात गाडी पार्कीगमध्ये लावण्याच्या कारणावरून भांडण सुरु होते. यामुळे मयत जाधव हा चालू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. तो भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला राज कदम, समाधान चौधरी दोघे रा.टेंभूर्णी (ता.माढा),सागर कुटे रा.वेणेगांव (ता.माढा) रणजीत पवार रा.टेंभूर्णी (ता.माढा) व इतर अनोळखी दोघेजण यांनी शिवीगाळी करून खाली पाडून हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली.
तसेच समाधान चौधरी व सागर कुटे यांनी चाकूने पाटीत व मांडीवर भोसकून जबरी वार करून खून केला.या घटनेत जीवे मारण्याच्या हेतूने घातलेले घाव वर्मी लागल्याने नागनाथ जाधव याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तसेच यावेळी सद्दाम पटवारी यांना ही हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले.यानंतर आय-२० कार व टाटा एंट्रा मधून मारेकरी घटना स्थानावरून पळून गेले.
ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नागनाथ जाधव यास प्रथम टेंभूर्णी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले होते.तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. घटनास्थळी करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस,सपोनी भुजबळ आदींनी भेट दिली आहे. याबाबत मयताचा भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय-३९ वर्षे) रा.वेणेगाव याने टेंभूर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.