

मंगळवेढा : अनैतिक संबंधातून तालुक्यातील मारोळी येथे एका युवकाची शनिवारी पहाटे चारच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना मंगळवेढा पोलिसांकडून अटक करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगोले (वय 29, रा. सलगर बुद्रुक) याचे मारोळी येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. शनिवारी पहाटे चार वाजता मयत सागर इंगोले हा वस्तीवर असलेला दिसून आले. तेव्हा संशयित आरोपी सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांनी सागर इंगोले याच्या डोक्यात काठीने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याची हत्या केली.
या गुन्ह्यातील संशयित दोन्ही आरोपींना मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना समजताच सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिसनिरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाची चक्रे त्यांनी वेगाने हलवत संशयित आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे करीत आहेत.
दरम्यान, मयत सागर याचे सलगर येथील बस थांब्याजवळ मोबाईल रिपेअरिंग, रिचार्ज करण्याचे दुकान आहे. तो अविवाहित होता. त्याची मारोळी येथील एका विवाहित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्या घरी जाणे सुरू केले. यातून संशयित आरोपी होनमुखे यांनी सागर याला संपवले. सागरचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.