Solapur Crime: मयत मुख्याध्यापकावर वैराग पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून उलगडले रहस्य

शेअर मार्केटमधून पैसे कमविण्याचा हव्यास जीवावर बेतला
Solapur Crime: मयत मुख्याध्यापकावर वैराग पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून उलगडले रहस्य
Published on
Updated on

काशिनाथ क्षीरसागर

वैराग : माझी सर्व मालमत्ता आई व मामाच्या मुलाच्या नावे करावी. माझ्या या कृत्याला कोणालाही जबाबदार धरू नये, अशा आशयाची चिठ्ठी योगेश पाटील याने आत्महत्येपूर्वी ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टींचे रहस्य यामधून उलगडले आहे.

बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील योगेश बाळासाहेब पाटील याने पत्नी माधुरी, मुलगा अथर्व व शिवांश यांना आईस्‍क्रीममधून विषारी किटकनाशक देऊन त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. योगेश बाळासाहेब पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा वैराग पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. मृत योगेशचा चुलत भाऊ महेश कालिदास पाटील यांनी वैराग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेशने निष्पाप तिघांना संपवल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

अमाप पैसा मिळवून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात योगेश शेअर बाजारातील एका कंपनीत पैसे गुंतवणूक करत होता. त्यात त्याला सुरुवातीला भरपूर पैसेही मिळाले. परंतु अफाट पैसे मिळण्याच्या आशेने त्याला एक प्रकारे व्यसन लागले. तो शाळेत नेहमी मोबाईल व लॅपटॉप वापरून शेअर बाजारात पैसे गुतंवणूक करत होता. जसा जसा त्याला तोटा होऊ लागला, त्यावेळेस तो आपला पगार व वडिलांच्या निधनानंतर आईला मिळणारी पेन्शन खर्च करत होता. वडिलांच्या निधनानंतर मिळालेले सुमारे ७० ते ८० लाख यालाही योगेशने चुना लावल्याचे निष्पन्न झाले आहे. मित्र व नातेवाईकांकडूनही योगेशने हातउसने पैसे घेऊन ते शेअर बाजारात गुंतवले. उसने पैसे वेळेवर परत देता न आल्याने तो आर्थिक तणावात होता.

पत्नी माधुरीचा स्वभाव शांत व संयमी असल्याने तीही या गोष्टीला प्रतिकार करत नव्हती. त्यामुळे त्याला अडवणारे कोणीही नव्हते. म्हणूनच याच गोष्टीचा गैरफायदा घेतला. पूर्वी योगेश गावाकडे आल्यानंतर मित्रांना तसेच नातेवाईकांना भेटत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याने सर्वांचा संपर्क तोडला. चार-पाच दिवसांपूर्वी आपल्याला सुमारे एक कोटी ८० लाख रुपये तोटा झाल्याचे व्हॉटसॲप स्टेटस ठेवले होते. एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आई बाहेरगावी गेल्याने योगेशने डाव साधला व पत्नीसह मुलांना आईस्क्रिममधून विष देऊन जिवे मारले. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्या सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास चालू असल्याचे वैराग पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news