

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली कोट्यवधीची मालमत्ता नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीरपणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे. यासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आहे.
फक्त पाचशे रुपयांच्या करारावर स्डेडियमचा ताबा दिला गेला आहे. यासाठी स्टेडियम कमिटीची मान्यता घेतली गेली नाही. 75 हजार रुपये अनामत रक्कम घेऊन हे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या घशात घालण्यासाठी हे कागदी घोडे नाचवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांच्या हा प्रताप आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजपाचे माजी नगरसेवक आनंत जाधव यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेतून 25 कोटीच्या असपास खर्च करून देखभाल दुरूस्तीच्या गोंडस नावाखाली सोलापूर महानगरपालिकेचे इंदिरा गांधी स्टेडियम नाममात्र शुल्क घेऊन 29 वर्षाच्या कराराने भाड्याने दिले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन समवेत केलेला करार बेकायदा आहे. कोट्यावधीच्या मालमत्तेचा करार पाचशे रुपयांच्या बॉंडवर कसा केला गेला असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. यासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया आणि त्यामध्ये घालण्यात आलेल्या अटी फक्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला कसा फायदा होईल, यासाठी काढल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
यामुळे शासनाचे कोट्यावधीचा महसुल बुडला आहे. या प्रकारास महापालिका आयुक्त आणि करार करणाचे अधिकारी जबाबदार आहेत. या बेकायदा करार रद्द करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे अनंत जाधव यांनी सांगितले.