Solapur News : मनपा निवडणुकीत आता प्रचाराचे नवे तंत्र
सोलापूर :शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. पारंपरिक प्रचार यंत्रणा आता कालबाह्य झाली असून मनपा निवडणुकीत उमेदवारांनी आता प्रचाराचे नवे तंत्र अवगत केले आहे. प्रचारासाठी समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर सुरू आहे. गल्लोगल्ली भोंगे लावून फिरणारे ऑटो, नेत्यांच्या लाखो मतदारांच्या उपस्थितीतील सभा हे सर्व कायम असले तरी त्याला आधुनिकतेची जोड मिळाली आहे.
महापालिका निवडणुकीचे प्रचार शिगेला पोहोचत असतानाच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन भाजप मतदारांशी साद घालत आहेत. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पार्क मैदानावर झालेल्या प्रचार सभेतील मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरकरांना दिलेल्या शुभेच्छांची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात आहेत. सन 2014 पासून भाजपाने सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे कंटेटचा वापर करुन मतदारांना आकर्षित करण्याचे तंत्र प्रचारात अवलंबिले जात आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी, पक्ष संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी हे निवडणूक प्रचारात उतरले आहेत. सोलापूर शहरातील विविध चौकात उमेदवारांनी केलेल्या कामांचा डिजिटल व्हॅनमधून प्रचार केला जात आहे. प्रचारात स्थानिक मुद्यांबरोबरच राष्ट्र, विकास कामे, केंद्र व राज्यातील सत्ता याचे गणित मतदारांसमोर मांडले जात आहेत. भाजपकडून महापालिका निवडणुकीतही वॉररुममधून प्रचारात मुद्दे सांगितले जात आहेत. कुठल्या भागात प्रचाराची गती वाढविण्याची आवश्यकता आहे, त्याचे मार्गदर्शन वॉररुममधून केले जात आहे.
महापालिका निवडणुकीचा प्रचार सर्व पक्षाकडून जोरदार सुरू आहे. प्रचारासाठी फक्त पाच दिवस शिल्लक असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांकडून सोशल मीडियातून, होम टू होम प्रचारावर भर देत असल्याचे चित्र अनेक प्रभागात पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील 47 उमेदवार हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर एक उमेदवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून, त्याला काँग्रेसकडून पाठबळ देण्यात येत आहे.
निवडणुका लढायच्या म्हटल्या की, प्रचाराचे हत्यार जवळ हवेच. या प्रचाराच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचता येते. निवडणूक व्यवस्थापनातील समीकरण जुळवताना त्यातील राजकीय, सामाजिक, जातीय, आर्थिक मंत्र एकीकडे फारसा बदललेला नसताना या सर्व बाबींना टप्प्यात आणणारे तंत्र पूर्णत: बदललेले आहे. यातील कसब काँग्रेसने आत्मसात केले आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी खा. प्रणिती शिंदे या प्रत्येक प्रभागात सभा, बैठका घेऊन उमेदवारांचे प्रचार करत आहेत. तसेच उमेदवार ही रिक्षा, कॉर्नर सभा, बैठका, सोशल मीडियातून जोरदार प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसत आहे.

