

सोलापूर : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनी राजकीय समीकरणे तर बदललीच, पण एका अत्यंत गंभीर प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असून, तुरुंगातून विजय मिळवण्याचा हा पॅटर्न आता राजकारणात चिंतेचा विषय बनला आहे. सोलापूरमध्ये भाजपच्या शालन शिंदे विजयी झाल्या आहेत.
सोलापूरच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शालन शिंदे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून तब्बल चार हजार मताधिक्याने विजय मिळवला. 3 जानेवारीपासून त्या कोठडीत असतानाही मतदारांनी त्यांना कौल दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 (नाना पेठ-गणेश पेठ) मध्ये सर्वात धक्कादायक निकाल लागला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात येरवडा तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) तिकिटावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा सोनाली आंदेकर यांनी पराभव केला. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जनतेने दिलेला हा कौल राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे (शिवसेना - शिंदे गट) हे बेकायदेशीर फेक कॉल सेंटर प्रकरणात नाशिक तुरुंगात आहेत. तरीही त्यांनी प्रभाग 11 मधून 4,213 मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला.
लोकशाहीसाठी धोक्याची घंटा?
निवडणुकीचे निकाल पाहता एक गंभीर वास्तव समोर येत आहे. जेव्हा विकासकामे आणि नैतिकतेपेक्षा शक्तिप्रदर्शन आणि दबदबा याला अधिक महत्त्व दिले जाते, तेव्हा लोकशाहीचे रूपांतर गुन्हेगारीच्या उदात्तीकरणात होऊ लागते. जर तुरुंगातील आरोपीच कायदेमंडळात किंवा महापालिकेत बसणार असतील, तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? जनतेने अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलेला पाठिंबा हा भविष्यातील राजकारणासाठी एक धोक्याचा संकेत आहे.