

सोलापूर : महापालिका निवडणुकीत यंदा मतदारांचा ‘नोटा’ या पर्यायाकडे लक्षणीय कल अनेक प्रभागात दिसून आला आहे. बऱ्याच प्रभागांतील मतदारांना उमेदवार पसंत न पडल्याने नोटा या पर्यायास मतदान केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांबाबत नाराजी, विकासकामांबाबत असमाधान आणि स्थानिक प्रश्नांकडे झालेले दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 25 मध्ये जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त मतदारांनी नोटाला मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाचा बटण दाबल्याची चर्चा तरुणांमध्ये झाली होती. त्याचा प्रत्यय मतमोजणीत दिसून आला आहे.
नोटांना मतदान देण्यामध्ये तरुण मतदारांचा अधिक कल असल्याचे मत राजकीय पंडीतांमधून व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मागील निवडणुकीच्या तुलनेत नोटा मतांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लोकशाहीतील जागरूकतेचे द्योतक मानली जात असली तरी, भविष्यात पक्षांनी आत्मपरीक्षण करून विश्वासार्ह उमेदवार देणे गरजेचे ठरणार आहे.