

सोलापूर : अगदी ठास्सून... दणकून... टिचून... सोलापुरात भारतीय जनता पार्टीने महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. भाजपची लाट अन्य सर्व विरोधी पक्षांचा सुफडा साफ करणारी ठरली. यामुळे सोलापुरात भाजपच धुरंदर असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे सर्वाधिक 87 जागा मिळवत अक्षरशः पाशवी बहूमत प्राप्त केले. त्याखालोखाल एमआयएमने आठ जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले. शिंदे शिवसेनेने चार जागा पटकावल्या तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली. माकप, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित आघाडी उबाठा सेनेचा सुफडा साफ झाला.
महापालिकेच्या 102 जाग्ाांसाठी 52 टक्के मतदान झाले होते. शुक्रवार (दि. 16) शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली. भाजपने निवडणुकीत 87 जागा मिळवत मोठे यश मिळवले. भाजपने मिळवलेले यश हे केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून, ते राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तब्बल 87 जागांमध्ये भाजपने पाशवी बहुमताची आकडेवारी ओलांडत प्रतिस्पर्ध्यांना फार मागे टाकले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएम पक्षाला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले.
गतवर्षी पेक्षा एक जागा कमी आली. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला चार जागा मिळाल्या, तर काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. विशेष म्हणजे माकप, राष्ट्रवादी शरद पवार गट, बसपा, उद्धव ठाकरे सेना, वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे सुफडा साफ झाला. या निकालांनी सोलापुरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. एकेकाळी प्रभावी मानले जाणारे अनेक पक्ष या निवडणुकीत अक्षरशः नामशेष झाले आहेत.
मतदारांनी विकास, स्थैर्य आणि ठोस नेतृत्वाला कौल दिल्याचे चित्र या निकालांतून स्पष्टपणे समोर आले आहे. विजयामागे भाजपच्या तीन आमदारांची रणनीती महत्त्वाची ठरली असली, तरी आमदार देवेंद्र कोठे हे खरे ‘किंगमेकर’ ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूण 87 जागांपैकी तब्बल 49 जागांवर देवेंद्र कोठे समर्थक उमेदवार विजयी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या कारभारात देवेंद्र कोठेंची भूमिका निर्णायक ठरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.