सोलापूर : महानगरपालिकेच्या 102 नगरसेवक पदासाठी सोलापूर शहर भाजपाकडे चक्क एक हजार आठ जणांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला. या हिशोबाने एका नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क 10 जण इच्छुक असल्याचे चित्र दिसून येते. एकूणच यावरून भविष्यात भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते,असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
इच्छुकांकडून भाजपने दि. 6 डिसेंबरपासून अर्ज मागवण्यास सुरूवात केली. त्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (दि. 13) होती. अंतिम दिवस असल्याने सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी केली. पक्ष कार्यालय हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वॉर्ड क्रमांक 15 मधील इच्छुक कार्यकर्त्यांने चक्क बैलगाडीतून आपला मागणी अर्ज शहर भाजपा कार्यालयात दाखल केले.