

सचिन इंगळे
मंगळवेढा : मंगळवेढा नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यंदा 5 माजी नगरसेवकांना मतदारांनी परत एकदा संधी दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. प्रभाग-4 मधील चंद्रकांत घुले हे 397 मते, प्रभाग 5 मधील अनिल बोदाडे 145 मते, प्रभाग 10 मधून प्रवीण खवतोडे हे 393 मतांनी विजयी झाले आहेत. तर स्वीकृत नगरसेवक असलेले गौरीशंकर बुरकुल हे तब्बल 1198 मतांनी विजयी झाले.
यावर्षी एकूण 6 माजी नगरसेवकांनी आपले नशीब आजमावले होते. यामध्ये चार जणांना परत एकदा विजयाची संधी मिळाली आहे. पांडुरंग नाईकवाडी, अरुणा खवतोडे या दोन माजी नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले. प्रभाग 4 मध्ये चंद्रकांत घुले यांनी 2016 मध्ये विजय संपादन केला होता. त्यावेळी त्यांच्या विजयासाठी ज्यांनी प्रयत्न केले होते, त्यांनी या निवडणुकीमध्ये विरोधामध्ये भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या आठ वर्षात प्रभागात ठेवलेला संपर्क व्यक्तिगत दिलेला मदतीचा हात या बळावर, याशिवाय प्रभागांमध्ये केलेल्या विकासकामांवर नागरिकांनी विश्वास ठेवल्याने त्यांना संधी मिळाली. प्रभाग 5 मध्ये अनिल बोदाडे हे गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले होते. यंदा मात्र त्यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संधी मिळाली. प्रभागाबाहेर जाऊन त्यांनी उमेदवारी घेत विजय संपादन केला.
प्रत्येकाशी विनम्रपणाने बोलणे व प्रभागातील लोकांच्या प्रश्नांवर काम करणे, यामुळे शेजारील प्रभागांमध्येही त्यांना प्रतिसाद मिळाला. येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा उमेदवार पसंत नसल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. प्रभाग क्रमांक 10 मधून प्रवीण खवतोडे यांनी परत एकदा दणदणीत विजय मिळवत विरोधकांना केलेल्या विकासकामांच्या जोरावर उत्तर दिले. त्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. मात्र प्रभागातील मतदारांनी त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला. हे त्यांच्या विजयातून दिसून आले. स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिलेले गौरीशंकर बुरकुल हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गतवेळी त्यांच्या पत्नी शीतल बुरकुल या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागावर लक्ष केंद्रित केले. यावेळी प्रभागातून मंगळवेढा शहरात सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले. पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये पांडुरंग नाईकवाडी हे निवडणूक लढवण्यास अनुकूल नव्हते. मात्र समीकरणातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. मात्र, बदललेली प्रभाग रचना व राजकीय समीकरणे न जुळल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.