सोलापूर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेच्या निवडीवरून शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ पाहायला मिळाला. या निवडीतील कथित गोपनियतेवरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे तसेच एमआयएमच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाकडे थेट जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली; मात्र सभागृह नेते आणि सत्ताधारी पक्षाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वातावरण अधिकच तापले. सभागृहात घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ वाढत गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता महापौर विनायक कोंड्याल यांना अखेर सभा तहकूब करण्याची नामुष्की पत्करावी लागली. त्यानंतर सर्व सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
स्वीकृत सदस्य निवडीसाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेत स्वीकृत 10, स्थायी समिती 16 आणि परिवहनच्या 12 सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार होत्या. सर्व नगरसेवकांची पहिलीच सभा होती. सभेची नियोजित वेळ 11 असताना तब्बल अर्धातास सभा उशिरा चालू झाली. स्वीकृत नगरसेवकांच्या नावार महापौर दालनात खलबते चालू असताना सभागृहात विरोधक मात्र वेळेत सभा चालू झाली नाही म्हणून आक्रमक झाले होते. त्याबाबत शिवसेना गटनेते अमोल शिंदे, कॉग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी प्रशासनास जाब विचारला.
सभेसाठी बरोबर 11 वाजून 48 वाजता महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आगमन झाले. सभा सुरू होताच सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी नगरसचिव यांना विषय पत्रिकेवर चार विषय असताना प्रधान्यक्रम वाचण्यास सांगितले. याला शिवसेना गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी अक्षेप घेतला. नवा कमी विषय असताना प्रधान्यक्रम कशाला अशी विचारणा केली. येथेच वादाची पहिली ठिणगी पडली. त्यावेळी सभागृह नेते काळे आणि शिंदे नरोटे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया घेण्यात आली. निवड झाल्यानंतर शिवसेना गटनेते शिंदे यांना भाजपच्या एका स्वीकृत सदस्याची निवड झाली नसल्याचे निदर्शनास आली. याविषयी त्यांनी नगरसचिवांकडे जोरकसपणे विचारणा केली. या प्रश्नाचे उत्तर देताना नगरसचिव गोंधळले. त्यांनी यादी नसल्यामुळे सातच नावे वाचून दाखवली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि महापौरांच्या डायसजवळ एकत्र आले. विरोधकांना एमआयएमचे पाठबळ मिळाल्याने शिंदे, नरोटे चांगलेच आक्रमक झाले.
यावेळी शिवसेना गटनेते शिंदे यांनी सभागृहात धक्कादायक माहिती उघड करत स्वीकृत नगरसेवकांच्या यादीतून अचानक एका व्यक्तीचे नाव वगळल्यामुळे संबंधित व्यक्तीने आत्महत्या करण्याचा मेसेज आपल्याला केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणामुळे सभागृहात आणखी खळबळ उडाली. शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसून गुप्तपणे निर्णय घेतले जात आहेत असा आरोप केला.
नगरसेवक नरोटे यांनी देखील सभागृहातील कामकाजावर नाराजी व्यक्त करत सत्ताधारी पक्षावर सभाशास्त्राचे नियम न पाळल्याचा आरोप केला. सभागृह नेते आणि सत्ताधारी पक्षाला सभागृह चालवण्याचा अनुभव नाही. आजचा दिवस महापालिकेच्या इतिहासातील काळा दिवस आहे. असे वक्तव्य त्यांनी केले. सत्ताधारी भाजपावर त्यांनी जोरदार टीका करत सभेतील गोंधळाला सत्ताधारीच जबाबदार असल्याचे सांगितले.
- भाजपने 25 लाख देऊन राष्ट्रवादीचा नगरसेवक फोडल्याचा शिवसेनेचा सभागृहात आरोप
- अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी आरोप फेटाळला.
- नगरसचिवांनी सभासद प्रस्ताव घेतला नाही नगरसेविका श्रद्धा पवार यांचा आरोप
- नगरसेविका श्रद्धा पवार यांना मी ओळखत नाही, नगरसचिव दंतकाळे यांच्या विधानाने सभागृहात खळबळ
- नगरसेवक आक्रमक नगरसेवकांचा अवमान करणाऱ्या नगरसचिव यांनी माफी मागण्याची मागणी
- महापौरांची नगरसचिवांना समज
- प्रत्येक सदस्यांचे सभासद प्रस्ताव दाखल करून अजेंड्यावर घेण्याचे महापौरांचे आदेश
- 87 नगरसेवक असताना भाजपला सभागृह चालवता येत नसल्याचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांचा आरोप
- रमजान चालू आहे. रात्रीचा पाणी पुरवठा बंद करण्याची एमआयएच्या सदस्यांची मागणी
- बीटूचा विषय उठवण्याचा ठराव करण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय
- शहरातील बेकायदा बांधकामा प्रकरणाचा विषय नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मांडला