

सोलापूर : महापालिकेच्या थकीत भाडेवसुली मोहिमेत गाळे सील करण्याचे आदेश पाळण्यात कुचराई केल्याप्रकरणी आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधितांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आता विभागीय चौकशीचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागांतर्गत मिनी गाळे, मेजर गाळे आणि खुल्या जागांचे कोट्यवधी रुपयांचे भाडे थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. थकबाकीदारांना व्याजात १०० टक्के माफी देऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. १६ जुलै रोजी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी आढावा बैठक घेऊन थकबाकीवरील १०० टक्के व्याजमाफीची मुदत २४ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२६ पर्यंत थकीत रकमेची प्रभावी वसुली करावी, अन्यथा थकबाकीदारांचे गाळे सील करावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
प्रत्येक पथक प्रमुख आणि संबंधित लिपिकाने दररोज किमान पाच गाळे सील करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १८ ऑगस्ट रोजी झालेल्या आढाव्यात एकाही पथकाने निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे समोर आले. आयुक्तांच्या आदेशानुसार अपेक्षित कारवाई न झाल्याने महसूल वसुलीवर परिणाम झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.