

सोलापूर : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सील ठोक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दि. २०, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत एकूण २३ गाळे, दोन दुकाने आणि एका कार्यालयाला सील ठोकण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांनी दिली.
महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. मालमत्ता कराची थकबाकी वेळेत भरावी, यासाठी संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कारवाईत पेठ ४ येथील शंकर विठ्ठल कामटे, पेठ ६० मजरेवाडी येथील रियाजोद्दीन जहिरोद्दीन मणुरकर, गोल्डफिंच पेठ येथील व्ही. रामकृष्ण नायडू, पेठ पूर्व मंगळवार येथील अंजनय्या हनुमंतू कोंगारी, बुधवार पेठेतील रवींद्र सिद्धराम बागदुरे, दिगंबर बाबू भिंगारे आणि परशुराम गणपतराव हिंगारे यांच्या मालमत्तांना सील ठोकण्यात आले.
तसेच दक्षिण सदर बाजार येथील सिद्राम कावळे यांचे कार्यालय, उत्तर सदर बाजार येथील श्रीमद् वीरशैव जन महासभा (ट्रस्ट) सोलापूर अध्यक्ष यांच्या मालमत्तेतील गाळे, सोरेगाव येथील सिद्धराम शिवराय व्हनमाने यांच्या गाळ्यांना आणि सुनील विश्वनाथ शिंदे यांच्या गाळ्यांनाही सील करण्यात आले आहे.