

सोलापूर : केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूरसाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नव्या बसेसची लांबी ९ आणि १२ मीटर असून ऑनलाईन तिकीट सुविधाही उपलब्ध असणार आहे.
न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० ई-बस नागरिकांच्या सेवेत दाखल होतील. शहरासाठी मंजूर झालेल्या १०० बसेसमुळे नागरिकांची सुविधा होणार आहे. न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे बांधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून ‘बिहाइंड द मीटर’ (बीटीएम) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे जुलैअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित
वाहनतळासाठी आवश्यक असलेली ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया आदी सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे. उपकेंद्र व केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली आहेत.
पूर्वीप्रमाणे असावी रिंगरूट
पूर्वी शहरातून ठराविक वेळेला एक रिंगरूट बस असायची. जी संपूर्ण शहराच्या सीमारेषांना स्पर्श करत फिरायची. त्याचप्रकारे दोन बस एकमेकांविरूध्द दिशेला सोडाव्यात, ज्याचा अनेकांना फायदा होईल.