Solapur News : आ. कोठेंकडून मनपा यंत्रणेची झाडाझडती

मध्यरात्री शहराची पाहणी : स्वच्छता नाही, रात्री मावा खात फिरणाऱ्यांवर आ. कोठेंकडून नाराजी व्यक्त
Solapur News : आ. कोठेंकडून मनपा यंत्रणेची झाडाझडती
Published on: 
Updated on: 

सोलापूर : स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर असे ब्रिद असणाऱ्या स्मार्ट सोलापूर सिटीत म्हणावे तसे स्वच्छतेचे काम होत नाही. पालिका नक्की काय करत आहे? रात्री तरुणाई मावा खात रस्त्यावर फिरत आहे. पोलिस प्रशासन काय करत आहे? अशा एक ना अनेक गोष्टींवर आमदार देवेंद्र कोठे यांनी नाराजी व्यक्त केली.

आमदार देवेंद्र कोठे यांनी नुकताच मध्यरात्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, पुणे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिसरात पाहणी दौरा केला. सर्वसामान्य नागरिकांची वस्ती असलेला परिसर इतकेच नव्हे तर चक्क जिल्हाधिकारी निवासस्थानाच्यासमोरही मातीचे ढिगारे, वाढलेले गवत होते. शहरात इतकी मोठी अस्वच्छता असताना बेजबाबदार मक्तेदार, कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी महापालिका आपल्याला चालवायची आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मध्यरात्री १२ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत नगरसेवक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समवेत शहरात विविध ठिकाणी फिरून स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.

रस्ते स्वच्छता करणारी पाच अत्याधुनिक यंत्रे, दोन टँकर, दोन ट्रॅक्टर, माती काढण्यासाठी बिगारी अशी यंत्रणा असूनही शहरात सर्वत्र अस्वच्छता, धूळ दिसून येत आहे. यासंबंधी टँकरच्या चालकाने रस्ते आणि फुटपाथ स्वच्छतेसाठी एक महिन्यापासून टँकर येत असल्याची चुकीची माहिती दिली. नागरिकांशी संवाद साधल्यावर मात्र या माहितीत तथ्य नसल्याचे समोर आले.

फुटपाथच्या दोन्ही बाजू आणि डिव्हायडरच्या दोन बाजू अशा चार बाजू स्वच्छतेसाठी दिलेल्या असताना दोनच बाजू स्वच्छ करत असल्याचे दिसून आले. हे पाहून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

यावेळी त्यांच्यासह नगरसेवक अक्षय अंजिखाने, सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेविका राजश्री धोडमणी, शशिकांत भोसले, ऍड. श्रवण साबळे, मनोज पिसके आदी उपस्थित होते.आमदार कोठेंनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत बिराजदार यांना रात्री १.३० वाजता फोन लावला. १५ दिवसांत शहरातील स्वच्छता झाली पाहिजे. कोणालाही पोसू नका, असे सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news