Gajanan Maharaj Palkhi : श्री गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची जय्यत तयारी

पालखी आगमनापूर्वी महापौरांनी केली तयारीची पाहणी
Gajanan Maharaj Palkhi
श्री गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची जय्यत तयारी
Published on
Updated on

सोलापूर : श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी सोलापूर शहरात आगमन होणार असून, पालखीचा शहरात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेविका वंदना गायकवाड, श्रीदेवी फुलारे, कल्पना कदम, नगरसेवक गौतम कसबे, रवी कैय्यावाले, भरतसिंग बडूरवाले, माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, अच्युतराव दुधाळ, श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे स्थानिक प्रतिनिधी सुनील कुलकर्णी व सुनील फाळके, उद्यान अधिकारी कोमल काशीद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रूपाभवानी पाणी गिरणी चौक येथून पाहणीला सुरुवात करण्यात आली. तुळजापूर वेस, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर, बाळी वेस, टेलिफोन भवन, कुंभार वेस, करण चौक मार्गे कुचन प्रशाला येथील पालखीच्या मुक्कामस्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी निश्चित करण्यात आलेल्या मंगल कार्यालयांसह मोदी रेल्वे ब्रीज ते दमाणी नगर मार्गाचाही आढावा घेण्यात आला.

महापौर विनायक कोंड्याल यांनी वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पालखी मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करून स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वाहतूक व आपत्कालीन यंत्रणा सज्‍ज ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. पालखी मार्गावरील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना यावेळी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची तयारी, वाहतूक नियोजन आणि मुक्कामस्थळी आवश्यक सुविधा यांची तपासणी करण्यात आली. पालखी मार्गावरील अडथळे तातडीने दूर करणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता अधिक प्रभावी करणे आणि प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news