MSCIT Scheme : दिव्यांगांना मोफत एमएस-सीआयटी

सोलापूर महापालिका राज्यात पहिली
MSCIT Scheme
दिव्यांगांना मोफत एमएस-सीआयटी
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत नोंद असलेल्या दिव्यांग बांधवांना आता मोफत एमएस-सीआयटी कोर्स करता येणार आहे. यासाठी महापालिकेने दिव्यांग कल्याणाच्या निधीतून १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. दिव्यांगांसाठी मोफत एमएस-सीआयटी कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेणारी सोलापूर महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

महापालिकेकडे सध्या २ हजार ८६२ दिव्यांग बांधवांची नोंद आहे. त्यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी महापालिकेकडे ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. त्यापैकी १० लाख रुपये एमएस-सीआयटी प्रशिक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०० दिव्यांगांना या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवी ते पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या दिव्यांगांना याचा लाभ घेता येणार आहे.

सामान्य विद्यार्थ्यांसाठी एमएस-सीआयटी कोर्स साधारण तीन महिन्यांत पूर्ण होतो. मात्र, दिव्यांगांसाठी हा कोर्स सुमारे पाच महिन्यांचा असतो. त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता असते. त्यामुळे दिव्यांगांसाठीच्या प्रशिक्षणाचा खर्चही अधिक आहे. सामान्य विद्यार्थ्यांसाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च येतो, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये खर्च आहे. एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण मिळाल्याने दिव्यांगांना संगणकाचे ज्ञान प्राप्त होईल. हे कौशल्य त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असे सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार व समाज कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news