

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक केवळ पक्षांची न राहता थेट राजकीय कुटुंबांची झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये उमेदवार पाहिले असता राजकारणाचा वारसा हा थेट घरातूनच मिळाल्याने उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. यात आमदार सुपुत्र, सासूबाई, भाऊ, सुनबाई, बंधुराज, तसेच माजी नगरसेवक व माजी महापौरांची पुढची पिढी असा संपूर्ण कुटुंबीयांचा फौजफाटा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे.
काही प्रभागांमध्ये थेट आमदारांचे सुपुत्र उमेदवार आहेत, तर काही ठिकाणी आमदारांच्या सासूबाई किंवा भावांनी राजकीय प्रवेश केला आहे. काही प्रभागांत आमदारांच्या सुनबाई निवडणूक लढवत असून, तर काही ठिकाणी बंधुराज राजकीय मैदानात उतरले आहेत. एवढेच नव्हे तर माजी नगरसेवक, माजी महापौर यांच्या घरातील तरुण पिढीही निवडणुकीत सक्रिय आहे. महापालिकेची निवडणूक लोकशाहीपेक्षा वंशपरंपरेची निवडणूक असल्याचे बोलले जाते.
एकीकडे पक्षांकडून नवे चेहरे, नव्या कल्पना याचा नारा दिला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक प्रभागांमध्ये तेच तेच राजकीय आडनावे पुन्हा-पुन्हा मतदारांसमोर येत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील नवोदित चेहरे आणि स्वतंत्र उमेदवार यांच्यासाठी ही निवडणूक अधिकच अवघड ठरत आहे. राजकीय घराण्यांची आर्थिक ताकद, संघटनात्मक पकड आणि सत्तेचा अनुभव यामुळे ते सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. त्यामुळे ही लढत केवळ पक्ष विरुद्ध पक्ष अशी न राहता, काही ठिकाणी थेट कुटुंब विरुद्ध कुटुंब अशी होत असल्याचे चित्र आहे.