

सोलापूर : महापालिका प्रशासनाने गत अंदाजपत्रकात 90 कोटी रुपयांची वाढ करत सन 2026-27 या आर्थिक वर्षातील तयार केलेले मनपा उत्पन्न 924 कोटी 45 लाख रुपये, शासन अनुदान 347 कोटी आणि कर्ज विभाग 111 कोटी रुपये असे तिन्ही मिळून एकूण 1,383 कोटी रुपयांचे कोणतीही कर वाढ नसलेले प्रशासकीय अंदाजपत्रक शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांना सादर केले. या अंदाजपत्रकास स्थायी समिती सभेत मान्यता घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये याला मंजुरी देण्यात येणार आहे.
महापालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक शुक्रवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती सभापतींकडे सादर केले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, भारतसिंग बडूरवाले, सतीश सिरसीला, अमर पुदाले, सत्यनारायण गुर्रम, बिज्जू प्रधाने, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, कल्पना कदम , महापालिकेचे मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, परिवहन व्यवस्थापक तपन डंके, कर संकलन विभाग अधीक्षक युवराज गाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
सन 2026-27 च्या अंदाजपत्रकात महसुली विभागामध्ये महसुली विभाग 761 कोटी 62 लाख 1 हजार, पाणीपुरवठा 138 कोटी 29 लाख 60 हजार आणि भांडवलीमध्ये 24 कोटी 51 लाख आणि आरंभी शिल्लक 2 लाख 57 हजार 401 असे 924 कोटी 42 लाख 61 हजार, तर खर्चामध्ये महसूल विभाग 729 कोटी 87 लाख 97 हजार, पाणीपुरवठा 133 कोटी 38 लाख 94 हजार आणि भांडवली कामासाठी 61 कोटी 15 लाख 70 हजार आणि अखेरची शिल्लक 2 लाख 57 हजार 401 अशी खर्च बाजू धरण्यात आली आहे.
शासन अनुदान 347 कोटी 92 लाख जमा आणि तितकेच खर्च तर कर्ज विभागामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी मनपा हिस्सा 29 कोटी 40 लाख असे एकूण कर्ज व म्युन्सिपल बॉण्ड मिळून 111 कोटी 1 लाख रुपये इतके जमा व खर्च असे महसुली उत्पन्न, शासन अनुदान आणि कर्ज तिन्ही मिळून एकूण प्रशासकीय अंदाजपत्रक 1383 कोटी 38 लाख 18 हजार 401 इतके आहे.
भांडवली कामासाठी उपलब्ध होणारी रक्कम
विकास शुल्क 24 कोटी रुपये, गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे - 51 लाख रुपये, महसूल निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्याची रक्कम 31 कोटी 74 लाख 4 हजार रुपये, पाणीपुरवठा निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्याची रक्कम 4 कोटी 90 लाख 66 हजार असे एकूण 61 कोटी 15 लाख 70 हजार रुपये आहेत.