Solapur News : सोलापूर मनपा भाजप गटनेतेपदी नरेंद्र काळे

नगरसेवकांचे वऱ्हाड पुण्यात, विभागीय आयुक्तांसमोर नगरसेवकांची ओळख परेड
Solapur News
सोलापूर मनपा भाजप गटनेतेपदी नरेंद्र काळे
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक नरेंद्र काळे यांची अखेर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी नवनिर्वाचित भाजप नगरसेवक शनिवारी दुपारी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. गटनेतेपदाचे नाव अधिकृतपणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सादर करण्यात आले असून, भाजपने ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून नरेंद्र काळे यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मात्र, पुण्याकडे रवाना होताना भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आमदार विजयकुमार देशमुख गट स्वतंत्र खासगी वाहनाने थेट विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचला. तर उर्वरित नगरसेवक दोन वेगवेगळ्या खासगी वाहनांमधून भाजप कार्यालयातून रवाना झाले. या प्रकारामुळे सर्वानुमते निर्णय असला तरी महापौर निवडीसाठी पक्षातील अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले.

गटनेतेपदी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व दिल्यामुळे नरेंद्र काळे यांचे नाव आता महापौर पदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी आमदार सुपुत्र डॉ. किरण देशमुख,विनायक कोंडयाल, अनंत जाधव ही नावे चर्चेत आली आहेत. मात्र सभागृह नेतेपदही ओबीसी समाजालाच दिल्याने, भाजप पुन्हा ओबीसी समाजालाच महापौरपद देणार का? हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनंत जाधव यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर मानले जात आहे. सामाजिक समतोल, अंतर्गत गटबाजी आणि सत्ता संतुलन या तिन्ही बाबी लक्षात घेऊन भाजप श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे सोलापूरच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. आगामी महापौर निवड ही केवळ पदाची नव्हे, तर भाजपमधील शक्तिसंतुलनाची कसोटी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. तब्बल 9 वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीने 102 जागेवर उमेदवार उभे करून मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढवली होती. सोलापुरातील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिले. या निवडणुकीत तब्बल 87 भाजपाचे नगरसेवक निवडून आले. नगरसेवक निवडून आल्यानंतर संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते. भाजपाच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्येक इच्छुक आपापल्या गॉडफादरमार्फत या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले. परंतु भारतीय जनता पार्टीने तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. विजयकुमार सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सर्व नगरसेवकांच्यावतीने या पदासाठी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली. ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्षनेता असताना केलेले काम, शहराध्यक्ष असताना पक्ष बांधणीसाठी केलेले कार्य व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असलेली कसब या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड केली आहे.

भारतीय जनता पक्षाने खूप मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत पाच वर्ष पक्षाची ध्येयधोरण तसेच सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवून शहराचा समतोल विकास साधणे ही मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. पक्षश्रेष्ठीने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे काम करून दाखवीन.
नरेंद्र काळे - नूतन सभागृह नेते, महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news