

सोलापूर : सोलापूर महापालिकेला शासनाकडून दोन उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्तांची प्रतीक्षा आहे. कमी अधिकाऱ्यांमुळे प्रशासकीय कामकाजात ताण वाढला आहे. शासनाने तातडीने हे अधिकारी पाठवण्याची गरज आहे.
महापालिकेतील उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि तैमूर मुलाणी यांच्या बदलीनंतर त्या पदावर शासनाने अधिकारी पाठविला नाही. मागील महिन्यात उपायुक्त तैमूर मुलाणी यांची पदोन्नतीने बार्शी येथे बदली झाली. त्यानंतर महापालिकेतील ही दोन उपायुक्त पदे रिक्तच आहेत. तीन सहाय्यक आयुक्त ही शासनाकडील पदे अद्याप रिक्त आहेत. यामुळे महापालिका प्रशासकीय स्तरावरील कामाचा ताण वाढला असल्याचे दिसून येते.
सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नुकतेच सुधारित विभाग वाटप आदेश काढले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे 8 विभाग, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे - 5 विभाग, उपायुक्त आशिष लोकरे - 13 विभाग, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले - 3 विभाग, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित - 4 विभाग, मनीषा मगर - 7 विभाग, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर - 1 (झोन कार्यालय), नियंत्रण अधिकारी तपन डंके - 4 विभागाची जबाबदारी दिली आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर ओढाताण होत आहे. महापालिकेचा प्रशासकीय कारभार नेटक्या नियोजन आणि सुलभ पद्धतीने चालविण्यासाठी रिक्त असलेली पदे भरणे गरजेचे आहे. शासनाने याचा विचार करून या पदांवरील अधिकारी महापालिकेकडे धाडणे आता आवश्यक झाले आहे.
आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने सन 2021 मध्ये मंजूर केला. या अंतर्गत स्थानिक पातळीवरील सहाय्यक आयुक्त पदे भरणे आवश्यक होते. शासन निकषांच्या पूर्ततेमुळे ही प्रक्रिया मधल्या काळात थांबली होती. महापालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधून शासन नियमाप्रमाणे स्थानिक पातळीवरील सहाय्यक आयुक्त ही पदे भरली जात नसल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, अशी ही सर्व पदे सध्या महापालिकेत रिक्तच आहेत.