Solapur Municipal Corporation : मनपाच्या ५९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज मुदतीत निकाली न काढल्याप्रकरणी दंड
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation (Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

सोलापूर : आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज मुदतीत निकाली न काढल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण ९१ हजार ९०० रुपयांचा दंड केला. संबंधितांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी काढले आहेत.

महापालिकेच्या ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ ॲप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित अर्जांची दखल घेत प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मुदतीत तक्रारी व अर्ज निकाली न काढणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी ऑनलाईन तक्रार प्रणाली सुरू केली आहे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांशी संबंधित अर्ज वेळेत निकाली काढणे व पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

९२ हजारांचा दंड

आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप वर प्रकरणे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी २३ कर्मचाऱ्यांना १६ हजार ८०० रुपये तसेच लोकसेवा अधिनियम हक्क अंतर्गत अर्ज प्रलंबित ठेवल्याने ३६ कर्मचारी व अधिकाऱ्यांना ७५ हजार १०० रुपये असे एकूण ५९ कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकूण ९१ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा दंड संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबरच्या वेतनातून वसूल करावे, असे उपायुक्त सोनाली यादव यांनी आदेशात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.